Skip to main content

हवामानबदलाशी लढण्यासाठी सेल्युलोजिक इथेनॉल

सध्या जागतिक तापमानवाढ आणि त्यामुळे होत असलेला हवामानबदल याचे परिणाम साऱ्या जगाला जाणवू लागल्याने हे विषय एकदम चर्चेत आले आहेत. त्यावर साऱ्या जगभरात संशोधन सुरू आहे.
हरितगृह वायूंचे वातावरणात होत असलेले उत्सर्जन हे त्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. कचऱ्यापासून सेल्युलोजिक इथेनॉलनिर्मिती करून गॅसोलिन (पेट्रोल) किंवा अन्य इंधनाऐवजी त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्याने वातावरणात सोडल्या जाणाऱ्या हरितगृह वायूंचे प्रमाण ८० टक्‍क्‍यांपर्यंत घटेल. त्यामुळे हवामानबदलाचे दुष्परिणाम कमी करता येऊ शकतील, असे मत सिंगापूर आणि स्वित्झर्लंडमधील शास्त्रज्ञांनी मांडले आहे. "ग्लोबल चेंज बायॉलॉजी ः बायोएनर्जी' या विज्ञानपत्रिकेमध्ये त्यांच्या संशोधनाचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.

पिकांपासून जैवइंधन बनविता येते, मात्र अन्नधान्याची गरज पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याने जास्त जमीन या पिकांखाली आणणे शक्‍य नाही, मात्र शहरे किंवा गावांमध्ये तयार होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून सेल्युलोजिक इथेनॉलसारख्या जैवइंधनांची निर्मिती करता येते. त्याचा वापर केल्यास कचऱ्याचीही विल्हेवाट लागेल आणि इंधनाचीही उपलब्धता होऊ शकेल, असे हे शास्त्रज्ञ म्हणतात.

नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरमधील शास्त्रज्ञ ह्युग टॅन यांनी सांगितले, की कागद, कार्डबोर्ड यांसारख्या टाकाऊ जैवभारावर प्रक्रिया करून त्यापासून प्रदूषणविरहित इंधन मिळविता येते, असे आमच्या संशोधनात दिसून आले आहे. हे तंत्रज्ञान पूर्णपणे विकसित केले तर जगाची ऊर्जेची काही गरज त्या इंधनातून भागवता येईल. त्यामुळे कार्बनी वायूंचे उत्सर्जन कमी होईल, तसेच जीवाश्‍म इंधनांवरील अवलंबित्वही कमी करता येईल.

या शास्त्रज्ञांच्या चमूने संयुक्त राष्ट्रसंघाचा मानवी विकास निर्देशांक (ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्‍स) वापरून १७३ देशांत किती कचरा तयार होतो, याचा अंदाज काढला; तसेच अन्य एका आकडेवारीवरून त्याच देशांमध्ये किती गॅसोलिन वापरले जाते, याचीही माहिती गोळा केली. त्या माहितीवर प्रक्रिया करून जी आकडेवारी डोळ्यासमोर आली, ती निश्‍चितच मार्गदर्शक आहे, असे त्यांनी सांगितले.

त्यांच्या अंदाजानुसार त्या १७३ देशांतील कचऱ्यापासून ८२.९३ अब्ज लिटर एवढ्या सेल्युलोजिक इथेनॉलची निर्मिती करणे शक्‍य आहे. सध्या वापरल्या जाणाऱ्या गॅसोलीनऐवजी त्याचा वापर केल्यास कार्बनच्या उत्सर्जनात २९.२ ते ८६.१ टक्‍क्‍यांपर्यंत घट होऊ शकते, असे त्यांचे म्हणणे आहे.

या संशोधनातील सहशास्त्रज्ञ स्वित्झर्लंडमधील लियान पिन कोह यांच्या मते, जर कचऱ्यापासून इथेनॉलनिर्मितीचे अत्यंत प्रभावी आणि किफायतशीर तंत्रज्ञान विकसित झाले, तर कार्बन उत्सर्जनात निश्‍चितच आणखी घट होऊ शकते, त्यामुळे सेल्युलोजिक इथेनॉल हे भविष्यातील महत्त्वाचे जैवइंधन बनू शकते.

सेल्युलोजिक इथेनॉल का उपयुक्त ?
जैवभारातील सेल्युलोजमधील ग्लुकोजपासून बनविल्या जाणाऱ्या इंधनाला सेल्युलोजिक इथेनॉल असे म्हणतात. कोणत्याही प्रकारच्या इंधनांच्या ज्वलनातून कार्बनी म्हणजेच हरितगृह वायूंचे उत्सर्जन होते. हे वायू हवामानबदलाला कारणीभूत आहेत. गॅसोलिन तसेच मका किंवा अन्य पिकांपासून बनविल्या जाणाऱ्या इथेनॉलच्या तुलनेत सेल्युलोजिक इथेनॉलच्या ज्वलनातून उत्सर्जित होणाऱ्या हरितगृह वायूंचे प्रमाण अगदी नगण्य असते, तसेच यासाठी मका किंवा ऊस यांसारख्या पिकांची लागवडही करावी लागत नाही. लाकडाचा भुस्सा, कागदाचा लगदा, म्युनिसिपल सॉलिड वेस्ट आदी प्रकारचा कचरा, तसेच पॉपलर, स्विचग्रास यांसारखी पिके आदी प्रकारच्या कचऱ्यांतील सेल्युलोजपासूनही या इथेनॉलची निर्मिती करता येते, त्यामुळे सेल्युलोजिक इथेनॉलची निर्मिती करून त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केल्यास हरितगृह वायूंचे उत्सर्जन तर घटेलच, पण साठे घटत चाललेल्या जीवाश्‍म इंधनांवरील अवलंबित्वही कमी करता येऊ शकेल.

माहितीचा स्त्रोत: दै. सकाळ

सर्व मराठी जनांसाठी....... मराठी जानणार्‍या सर्वांसाठी....
या संकेत स्थळावर व्यक्त केलेली मतं ही त्या त्या लेखकांची व्यक्तिगत असुन मराठी दर्पण त्या मतांशी सहमत असेलच असे नाही.