Skip to main content

रजाकार: हैद्राबाद मुक्तीसंग्राम - प्रकरण 10

प्रकाशीत विभाग

तोफ आणताना शरीराला थोडा ताण पडला होता थकल्या मुळे आराम घेणे भाग पडले. 4 दिवसानंतर गटातील मित्र पून: एकत्र जमलो. पूढे काय करावे इतर शस्त्रे जमा किती झाली कोणत्या प्रकारची आहेत हे माहीत करण्यासाठी शहरात आमचे जिथे गट होते तिथे भेटी घेण्याचे ठरविले. मिळालेले म्हणजे जमा झालेले शस्त्रास्त्रे उपयुक्त आहेत किंवा खराब आहेत ते पाहण्याचे ठरले. तरवारी, जंबीये, गुप्त्या, बंदुकी, रायफळ, इत्यादी वस्तु शस्त्रास्त्रे होती.
तरवारी, जंबीये, गुप्ते हयांना जंग लागला होता. ती स्वच्छ करण्यात आली पुढे 4 दिवसांनी बंदुकी व्यवस्थित करण्यात आली त्याचे खटके (घोडे थोडे नादुरूस्त होते ते दुरूस्त करण्यात आली) सर्व रिवालवर व्यवस्थित होते.
एका जंगलात माळावर जावून बंदूका व रायफली उडवून प्रात्यक्षिक करण्यात आली. संपूर्ण एक दिवस हया प्रात्येक्षिकात गेला रात्री घरी गेलो. आपआपल्या गटात जागेत शस्त्रास्त्र नेवून ठेवण्यात आली. सगळया सर्व शस्त्रास्त्रांमध्ये तोफ महत्वाची असून त्याचे प्रात्येक्षिक करण्यात आले नव्हते.
शहरात रजाकाराचा धुमाकूळ चालूच होता. DSP आॅफीस मध्ये तोफ जागेवर नसल्याबद्दल कोठेही कुणकुण नव्हती. त्यामुळे आमच्या मनात तोफे संबंधी काळजी वाटली नाही. परंतू एके दिवशी बोलता बोलता तोफेचा उपयोग कसा करावा हया संबंधी विचार झाला कारण तोफ मैदानात फार दिवसापासून असल्यामुळे गंजून (जंगून) गेली होती ती साफ स्वच्छ करण्याचे ठरले. आतून बाहेरून जेथून आग लावतात (विस्तू) तो भाग साफ करून घेतला. तोफेसाठी दारू गोळा व तो तोफेत ठासण्यासाठी लोखंडी दांडा लागतो तो आणून त्याचे ठासण्याचे तोंड साफ केले. तोफेस बांधून असल्यामुळे ते थोडे सैल करून मागे घेण्यात आले. तोफेचे तोंड थोडे उचलून वर करण्यात आले. एक तास दारू गोळा ठाण्यात आला. नंतर रात्री साधारण 11 वाजता विस्त्याने तोफेच्या पेट घेणाया भागावर जळका (विस्तू) असणारा बोळा ठेवण्यात आला. परंतु ती तोफ पेट घेत नव्हती व त्यामुळे ती उडाली नाही व आवाज ही झाला नाही.
नंतर आम्ही विचार करू लागलो की तोफ निकामी असल्यामुळे ती कार्यक्षेम नाही म्हणून सरकार ही तोफेची दखल घेत नाही. परंतू फार मेहनत करून आणलेली तोफ याचा उपयोग झाला पाहिजे, किमान एकदा तरी पेट घेतला तर बरे होईल असे विचार आले.
आम्ही रोज रात्री जमून त्या तोफेत दारू ठासित असू आणि पेटवून वाट बघत बसू असे आठ दिवस झाले.
एक दिवशी लक्षात आले की तोफेला ज्या ठिकाणाहून जागेहून पेट घेते त्या जागेत कांही लोखंडाचे बारीक बारीक गोल गोटया सारखे छरे बारिक तारेच्या साहयाने गुरफटलेले होते ते बॅटरीच्या साहयाने दिसले हे सर्व काढण्यासाठी सोनाराच्या दुकानातून चिमटे आणून, घासून बार तोडले. त्यामुळे ते सर्व गोल लोखंडी बारिक छरे मोकळे झाले व त्या तोफेतून फार बारिक पकड किंवा चिमटयाच्या साहयाने काढले. त्यामुळे तोफ पेट घेण्याची जागा रिकामी झाली या प्रयत्नासाठी एक रात्रभर प्रयत्न करावे लागले. नंतर सर्व आपआपल्या घरी गेलो व प्रत्येकाने तणावून झोपा काढल्या. आमच्या प्रयत्नाला यश केव्हा येईल ही काळजी होती. घरातील कोणत्या कामात आमचे मन नव्हते. दिवसा एक दोन वेळेस तरी आम्ही होळीवर येवून कृष्ण मंदिराकडे पाहून मगच इतरत्र फिरत असू. पून: दोन दिवसांनी तोफ साफ करून पूर्वीची भरलेली ठासलेली दारू दांडयाने उकरून काढली. आणि न सर्द झालेली दारूगोळा आम्ही तोफेत ठासला. रात्री 12 नंतर तोफेस पेटविले थोडया वेळ नंतर त्या तोफेतून पेटलेली दारू फार छकाटयाने तोफेच्या बाहर विस्तू रूपाने आली परंतु आवाज झाला नाही.
पण एक गोष्ट लक्षात आली की अद्याप तोफ पेट घेत नव्हती आज तीने पेट घेवून दारू विस्तू रूपाने आली म्हणजे प्रगती झाली थोडेसे समाधान वाटले.
आमचे प्रयोग असे 5/6 वेळेला झाले तोफ पेट घेवून दारू बाहेर येत असे परंतू आवाज नाही. तोफ आतून व्यवस्थित मोकळी झाली कार्यक्षम झाली यातही थोडा आनंद वाटला.
कष्टाला फळ येते, कष्ट करून पहावे व निश्चयही करावा लागतो तो निश्चय आम्ही केला ती तोफ दारू गोळाने ठासण्यासाठी प्रत्येकाने निदान एक तास याप्रमाणे 5 जणांनी तोफ ठासली नंतर पेटविली तोफ उडाली व साधारण आवाज ही झाला आम्ही जिंकलो आमची तोफ आवाज करीत उडाली ब्रम्हानंद व्हावा तसे आम्हांस झाले.
आमची प्रगती होत राहिली. आमचा आशावाद बळावला. आमची शरीरातील सर्व सूस्ती व निराशा निघून गेली. आम्ही जोमाने कामाला लागलो. तोफ कार्यक्षम होवू लागली. परमेश्वराचे चिंतन करीत एके दिवशी पूर्ण रात्रभर त्या तोफेत ठासता येईल तितका दारूगोळा पूर्ण ताकदीने ठासला आणि घरी निघून गेलो.
दुसरे दिवशी पून: रात्रौ जमलो आणि तोफेत दारू भरण्यास (ठासण्यास) जागा शिल्लक नाही हे पाहिले रात्रीचा एक 1 वाजला होता तोफेला पेटविण्याचा विचार आला तोफ पेटविण्याच्या जागेवर पेटविण्यासाठी विस्त्याचा चांगला मोठा बोळा ठेवला.
तोफेजवळ उभे राहण्यासाठी सर्वाना उभे टाकता येईल अशी जागा नव्हती. आम्ही जिन्याच्या खाली उतरून गच्चीवर थांबलो तोफ पेटवून 10 मिनिटे झाली होती तरी तोफ उडालीच नव्हती पून्हा तोफेजवळ जिन्यावर जावे असा विचार केला एकही जिन्याची पायरी चढता आली नाही तोच तोफेचा आवाज एवढा मोठा भयंकर झाला की आम्ही गच्चीवर उभे असलेले सर्वच्या सर्व गच्चीवर आडवे पडलो. सर्व कृष्ण मंदिर हादरले आमच्या सर्वांच्या कानटाळया बसल्या. आवाज एवढा भयंकर होता की होळी इतर जवळच्या गल्ल्या हादरल्या सारख्या झाल्या नांदेड भोवताली 10 किमी पर्यंत लोकांना ऐकू आला. नांदेड शहर जागे झाले तरूण, म्हातारे, मुले सर्व दचकून उठले. कुठे काय झाले. महाभयंकर आवाज कशामुळे झाला शहरात रजाकारांनी कांही वाईट केले काय ही भिती प्रत्येकाला वाटली. रात्रौ 2 नंतर शहर झोपलेच नाही. आम्ही मात्र पूर्ण भेदरून गेलो होतो.
तरी सर्वांनी उभे टाकण्याचा प्रयत्न केला की तोफेच्या आवाजामुळे हादल्यामुळे आमच्या पाठीला, तोंडाला, हाताला मुक्का मार लागला होता. थोडया वेळाने एक मेकाला बोलू लागलो व रस्त्याने कांही न बोलता घरी जाण्यास ޵िनघालो. रस्त्याने लोक घरातून येवून रस्त्यावर जमा झालेले व आपसात मोठ मोठयाने बोलत असलेले दिसले. आयुष्यात एवढा मोठा आवाज ऐकला नाही’’ असे म्हणत होते. हिंदूच रस्त्यावर जमा झाले होते अस नाही तर मुसलमानही आपल्या उदूर् मुसलमानी भाषेत वार्तालाप करीत होते. प्रत्येकजण आपआपल्या कल्पने प्रमाणे आवाजाचे साम्य करीत होते. एक मुसलमान म्हणत होता, अब ޵किसीको, जन्नत नही मिलती सब को दोजख मे जाना पडता, खुदा के दिलमे क्या है कोन जानता ? म्हणजे आता स्वर्ग कोणालाच नाही सर्वांना नरकात जावे लागेल. परमेश्वराच्या मनात काय आहे कोण जाणतो.
शेवटी आम्ही आपआपल्या घरी जावून झोपी गेलो.
दुसरे दिवशी संपूर्ण नांदेड शहरात या आवाजा संबंधी चर्चा चालूच होती. कोणालाही कशाचा पत्ता लागला नाही. परंतू आवाज बंदुकीचा नाही हे सर्वांना समजले आणि निझाम सरकारचे गुप्त हेर खाते कामाला लागले. प्रत्येक गल्लीत बोळीस जावून आपआपल्या पध्दती प्रमाणे चौकशी करीत होते. मुसलमान व रजाकार ही बुचकळयात पडले. त्यांच्यापैकी कोणाजवळ एवढा मोठा आवाज करणारे शस्त्र नाही हे लक्षात आले. हिंदू जवळ असेल तर आपले मरण लांब नाही म्हणून घाबरले. तपासाचे चक्र जोरात चालू झाले. आमच्या गटातील लोक होळीवर व कृष्ण मंदिराजवळ जाण्यास फिरकले नाही. हिंदूचे मठ, धर्मशाळा, मोठे मोठे बंगले रजाकार व मुसलमानांनी येवून तपासून पाहिले त्यांना कुठेही कांही आढळले नाही. घरावर कांही ठिकाणी दगडाची जमा झालेली गिट्टी आढळली त्या घरमालकास विचारणा होई कि एवढी गिट्टी कशासाठी जमा केली. घर बांधकामासाठी विशिष्ट कामासाठी बांबु, सिमेंट मिसळून त्याचा उपयोग करतात
घरोघर अशा प्रकारच्या तपासण्या झाल्या. आमचे कृष्ण मंदिर रस्त्यावर असल्यामुळे कोणी आले नाही. 3 दिवसानंतर कोणी तरी CID ला इथे कृष्ण मंदिरात रात्री मोठे पोर जमा होतात असा बहाणा केला. तपासणीचे काम चालू होते आम्ही थोड शांततेने होळीवर फिरत होतो. एका दुकानासमोर उभे होतो. सकाळचे 11 ची वेळ होती. पोलीस व रजाकार त्या मंदिरात गेलेले दिसले हे पाहाताच आमच्या मनात भितीची धडकी भरली. मंदिर तपासून झाल्या सारखे होते पण त्यातील एक रजाकार माडीवरून पायर्याने जीन्यावर गेला जिन्यावर तोफ पाहिल्या बरोबर तो मोठयाने ओरडला मिल गयी मिल गयी मग पोलीस दुसरे रजाकार व इतर लोंक त्या जिन्यावर तोफ पाहून खाली येत असत त्यानंतर थोडया वेळाने पोलीस फाटा (जास्त प्रमाणात) आला सर्वांनी मिळून पंचनामा केला. त्या तोफेला बांधलेल्या दोर्या सोडल्या त्या ठिकाणी दारू गोळा कांहीच सामान नव्हते ती तोफ व्यवस्थित बांधून जिन्याहून मंदिराच्या अंगणात सोडली लोक जमा झाले पाहू लागले. आम्ही सर्व दुरून पाहत होतो व आम्ही आमच्या घरी न जाता कोणासही माहीत होणार नाही व वेगवेगळया जागी व गावी गेलो.
आमच्या सर्व जणांची तरूणांची नांवे बहुतेक इतरांना माहित नसावीत म्हणून आमच्या तरूणांची नावाची यादी पोलीसांना सापडली नाहीत.
आमची चौकशी कोण कोण तीथे मंदिरात जमतात सुरू झाली. आमच्या पैकी कोणीही जीव गेला तरी नांवे न सांगण्याचे आगोदर ठरले होते.
इतरांनी सांगण्यावरून अंदाजाने 5/6 जणांची नांवे पोलीसाकडे असलेली दिसले.
शेवटपर्यंत पोलीसांनां व CID ला आमच्या कार्याचा ठीकाणा लागला नाही. एकंदर 3 वेळेला माझा तपास करीत पोलीस आले व मला वाजराबादच्या सिटी पोलिस ठाण्यात नेवून मला दटावण्यात आले व माहिती देण्यास सांगितले मी घाबरलो परंतू मेलो तरी सांगणार नाही असा संकल्प केल्यामुळे सांगितले नाही. एकदा मीलच्या पाठीमागे असलेल्या तरूंगात नेवून दाखल करावे म्हणून पोलिसांनी तिथे नेले परंतु तुरूंग अधिकारी व पोलिस यांच्यात कांही तांत्रीक बाबीवरून तुरूंगात ठेवण्यात आले नाही मला भूक फार लागली होती मी घरी पायी चालत जावू शकत नाही मला घरापर्यंत नेवून सोडा तुम्हाला पाहिजे तेव्हा मी हजर होईन असे म्हणालो. पोलिसांनी मला एका त्यांच्या ओळखीच्या टांग्यात बसविले. चौकापर्यंत नेवून सोडण्यास. मी टांग्यात बसून चौकात आल्यानंतर उतरलो. घरी माझी आई माझी वाट पाहत होती. मी आईच्या पाया पडलो आईने मला जेवायला ताट वाढून दिले. मी जेवलो थोडा वेळ झोपलो. माझ्या पाठी मागे संकट आहे पूढे काय होईल याची काळजी दैनंदीन होती. माझ्या सारखी तपासणी माझ्या गटातील इतरांची ही झाली. परंतू एकजणही आपल्या संकल्पा पासून ढळला नाही.
एकदा मला पोलीस नेत असता होळीवर एका बोळीतून जावू लागलो तो रस्त्याच्या बाजूला एक खाटकाचे दुकान होते तेथे तो पोलीस थांबला आणि कांही तरी त्याने खाल्ले त्यावर एक ग्लास दारू अथवा कांही तरी एक ग्लास पिले त्यानंतर त्याला चक्कर आली. तो रस्त्यावर पडला मी बराच वेळ तिथे थांबलो. परंतू त्या पोलिसाला उठता येईना तेव्हा त्या दुकानदाराने का थांबला म्हणून विचारले मी सांगितले हे पोलिस मला घेवून आले आहेत. त्यांच्या बरोबर जायचे आहे. दुकानदार म्हणाला आता तुम्ही थांबू नका तूम्ही जा पोलिस हुशार (शुध्दीवर) आल्यावर मी हाकलून दिले म्हणून सांगतो. अशा प्रकारे दैव गतीने प्रसंगानुसार माझी सूटका झाली. आमच्या गटातील लोकांचा एका ठीकाणी जमण्याचा विचार करण्याचा कार्य करण्याचा ठीकाणा बंद झाला. रस्त्याने आमची भेट होत असे गावातील इतर गट आपआपली कार्य शस्त्र जमविणे चालूच होते. पोलीसांचा पाठलाग आम्हाला एकसारखा असल्यामुळे आम्ही नांदेड सोडले. निझाम स्टेट सोडले, कोणी पूणे, उमरखेड, नाशिक, नांदगाव अशा ठिकाणी निर्वासित म्हणून भटकत राहिलो.

**** स्वातंत्रसैनिक प्रभाकरराव माणिकराव नांदुसेकर, नांदेड ****
---- क्रमश: ----

सर्व मराठी जनांसाठी....... मराठी जानणार्‍या सर्वांसाठी....
या संकेत स्थळावर व्यक्त केलेली मतं ही त्या त्या लेखकांची व्यक्तिगत असुन मराठी दर्पण त्या मतांशी सहमत असेलच असे नाही.