अगदी लहान होतो. ४-५ वर्षाचा. मला आठवून जातेय माझे एक गाव. नाव -श्रीगोंदा. नगर जिल्ह्यात असलेले. आम्ही रहात होतो ते अगदी गावाबाहेर. जंगलच वाटावे असा परिसर.
त्याकाळी वीज नव्हती.रात्री नुसता काळोख.
घरात ओगल्यांचे हिरवे कंदील.
कंदील म्हटले म्हणजे मला तो हिरवा कंदिलच डोळ्यासमोर येतो.
घर म्हणजे बंगलाच अगदी नदी ओलांडून गेले की हाकेच्या अंतरावर बंगला होता. सरकारी बंगला.
आजूबाजूला वस्ती नाहीच . अवाढव्य आवार.
संध्याकाळी काजवे दिसायचे.
दूरवरच्या शेतातील झोपडीत दिव्याचा मिणमिण प्रकाशाचा ठिपका अंधार अधिक भयान करायचा .
बाबा बर्याच वेळा फिरतीवर
घरी आम्ही चार भावंडे नि आई.
सोबत रात्री जागले असायचे. तेवढीच सोबत.
एकदा सकाळी सकाळी जाग आली .उठलो. अंगणात गेलो. बघतोय तर अंगणात ४-५ कोंबड्या मस्त दाणे टिपत हुंदडत होत्या. करमत नव्हते म्हणून घरात कोंबड्या आल्या. सकाळी सकाळी त्याना झाकलेल्या डालग्याजवळ जाऊन माकडछाप दंत मंजनने दात घासत कोंबड्यांची किलबिल ऐकत बसायचो.मस्त वाटायचे. मग ४-५ दिवसात कोंबडा आला. पांढरा शुभ्र. तुरेबाज कोंबडा. संध्याकाळी त्याला चुलीवरून ओवाळून ठेवला.
असे का ..?
अशाने तो कोठे पळून जात नाही.
सकाळी सकाळी त्याच्या मस्त बांगेने आमची झोप उघडायची तेव्हा किती मस्त वाटायचे.
कधी कधी कोंबड्या पांढरी शुभ्र अंडी द्यायच्या.
किती मस्त अंडी होती.
छोटी छोटी गोजिरवाणी.
मी ओंजळीत घेऊन त्यांचा मस्त सुगंध घ्यायचो.
आई आम्हाला दुधात अंड कालवून द्यायची .
दुधावर अंड्यातील पिवळ्या बलकांचे छोटे छोटे पिवळे ठिपके तरंगायचे
ते आंम्हाला मुळीच आवडत नसे.
छी किती घाण वाटायचे. .
कोंबडीची एक अपघाती घटना आमच्या बंगल्यात घडली. कधीकधी ती आठवली की मन कासावीस होते.
बंगल्याला जो व्हरांडा होता त्या व्हरांड्याला हिरव्या रंगाच्या लाकडी जाळया मारलेल्या होत्या.रेल्वे क्वार्टरला असतात तशा
बाहेर कोंबड्या खेळत होत्या .कशी कुणास ठाऊक कडेची जाळी धपकन पडली .नि त्यात एक कोंबडी जखमी झाली. तिला पाणी पाजले असे काही काही खूपसे केले .शेवटी तिने आपले हातपाय लांबवले. कोंबडी गतप्राण झाली
तेव्हा ही पाखरे मरतात ह्याची जाणीव आम्हाला होती .
मला आठवतेय की एका झाडाखाली आम्ही माती उकरून खड्डा तयार केला नि त्यात ती कोंबडी ठेवून तिच्यावर माती लोटली .
चांगला डोंगर तयार केला नि त्यावर जास्वदिचे फुल ठेवले .
वाईट तर वाटले .दुख झाले मग सहज थोड्यावेळाने तेथे गेलो तर खड्डा उकरून ठेवलेला . खड्डा मोकळा होता .
काहीतरी भूताटकीचा प्रकार असावा असे वाटून आम्ही गप्प बसलो .
अशाही घटना घडत होत्या
श्रीगोंदा म्हणजे भूतांचा गाव वाटत होता .
अशाही घटना घडत .पण आम्ही हे सर्व पटकन विसरूनही जात असू .
विसरण्यात देखील एक मजा असते.
मग दुखं देखील हसू लागते.
.कधी कधी मामा यायचा.मग नुसती मजा असायची.
बाबांनी आम्हाला दोन छोट्या सायकली आणल्या होत्या. माझी अगदी छोटी घंटीवाली .दादाची स्पोकवाली पण तीन चाकी .सायकल. मामा मोठ्या सायकलला दोरी बांधून आमच्या दोघांच्या सायकलला गाठ बांधून र्रेल्वेच्या डब्यासारखी जोडून सायकलने आम्हाला नदी किनारी घेऊन जायचा, तेव्हां किती मस्त वाटायचे, नदीवर अगदी धमाल यायची. पाणी एवढे स्वच्छ की नदीचा नितळ तळ स्वच्छ दिसायचा. आम्ही त्या वाळूत झरे खोदत बसायचो. तिथे पाणी यायचे.
काय जादू असायची कुणास ठाऊक. ....?
नदीवरून परत येता येता मामा एखादी कविता गुणगुणायचा.
कवी यशवंताची ती कविता होती -
"अजुनी कसा येईना पर्धान्या राजा
किरकिरती रातकिडे झाल्या तिन्ही सांजा "
मामा कविता म्हणे तेव्हा एक छान दृश्य डोळ्यासमोर उभे राही. त्याचे गुणगुणणे मस्त वाटे.
संध्याकाळ झाली आहे. रातकिडे किरकिरू लागली आहेत .अजून गायीच्या धारा काढायाच्या आहेत. पर्धान्या राजा अजून येत नाही म्हणून तिचा जीव कासावीस होत आहे.
आमचे दिवस छान चालले होते.
रंगी बेरंगी फुलपाखरासारखे गिरकी घेत झुलत होते.
अंगणात खूप गारगोटे होते.
पांढरट रंगाचे. अंधारात एकमेकावर घासले की छान प्रकाशाच्या ठिणग्या उडत.
ठिणग्यांची जादू आम्हाला समजली `होती. आम्ही रात्री अंधारात जाऊन गारगोटे एकमेकाला घासत असू. नि ठिणग्याची चकमक बघत बसू .
कधी कधी आई संध्याकाळी आंबेमोहर तांदूळ शेगडीवर ठेऊन त्याचा भात बनवीत असे . त्या भाताचा सुगंध घरभर पसरे. दूध-साय भात म्हणजे आमची मस्त मजा होती.
काही काही जीवघेण्या घटना घडत होत्या.
एके दिवशी आईची मैत्रीण पहाटे पहाटे स्टेशनवर उतरली. टांग्याने एकटीच येत होती नदी ओलांडली नि तिला त्या माळवदावर एक दिवा तरंगताना दिसला. एवढी घाबरली की तिला तापच भरला . काय झाले म्हणून तिलां भेटणे झाले. तिची हकीगत ऐकून दुसर्या दिवशी पहाटे पहाटे बाबा नि त्यांचे दोन मित्र काय प्रकार आहे म्हणून बघावयास गेले. कालचीच घटना त्याना दिसली.
दिवा तरंगताना दिसू लगला. थोडीशी घाबरगुंडी उडाली. पण मनाचा हिय्या करून त्या दिव्याचा पाठलाग केला.
दररोज एक फकीर पहाटे पहाटे मशिदीत जात असे. अंगावरची हिरवट काळसर कफनीने अंधारात काहीच दिसत नसे . फक्त दिवा.
गूढ उकलले. बाईचा ताप पळून गेला.
असा हा प्रकार अशा रोमांचकारी आठवणी
मग आम्ही गावात घर घेतले.
गावाच्या बाहेर बंगल्यात आई जाम घाबरायची.
घर भाड्याचे
माडीवरचे.
ते घरपण भूताटकीने पछाड्लेय असे समजले.
आईला कोठेही भूत दिसायचे .तो काळच तसा होता .भुताने झपाटलेला ..!!
त्यात आमच्या ४-५ कोंबड्या माळवदावर उंडारत असायच्या. मी ४-५ म्हणतोय त्यातली एखादी आज लक्षात आहे. त्यातील एक कोंबडी आजारी होती.मलूल झाली होती. खिन्नपणे बघत बसलेली मला आठवते. काय झाले होते तिला कुणास ठाऊक. .?मरता मरता मला तिच्या मानेतून अंडे पडले असे वाटत होते. हा सगळा लहानपणचा भास आहे. पण तो भास मला अजूनही खरा वाटतोय..तेव्हा मी ४-५ वर्षाचा होतो .नि लहानपणीचे सर्व भास पक्के असतात. ते पुसले जात नाही कधीसुद्धा
.
श्रीगोंदा म्हटले म्हणजे मला हे सगळे दिसू लागते.
मामाचे गाणे -अजून कसा येईना पर्धान्या राजाच्या ओळी माझ्या भोवती फेर धरू लागतात .. नि मन जुन्या आठवणीत हरवून जाते ....
- आपल्या प्रतिक्रीया नोंदविण्या साठीयेण्याची नोंद करा किंवा नविन खाते उघडा
सर्व मराठी जनांसाठी....... मराठी जानणार्या सर्वांसाठी....
या संकेत स्थळावर व्यक्त केलेली मतं ही त्या त्या लेखकांची व्यक्तिगत असुन मराठी दर्पण त्या मतांशी सहमत असेलच असे नाही.